राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ – changbhalanews
राज्य

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ; एसटी कर्मचारी कृती संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला. यानिर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेचे ॲड. गुणरत्न सदावर्दे, हनुमंत ताठे, संदीप शिंदे, श्रीरंग बरगे आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आभार मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close