सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन पर्यंत 43.83 टक्के तर राज्यात सरासरी 42.63 टक्के मतदान – changbhalanews
राजकिय

सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन पर्यंत 43.83 टक्के तर राज्यात सरासरी 42.63 टक्के मतदान

उमेदवारांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकुटुंब मतदान केंद्रात जाऊन बजावला मतदानाचा हक्क

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके

सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 43.83 टक्के मतदान झाले. तर राज्यात तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघात सरासरी 42.63 टक्के मतदान झाले. रखरखत्या उन्हात ही मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात रांगा लावल्या होत्या.

सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी श्री तुळजाभवानी माता व छत्रपती प्रतापसिंहमहाराजांचे शुभाशिर्वाद घेऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
“निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे. आज सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात सहभागी व्हा व देशाची लोकशाही बळकट करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तर इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुटुंबियांसमवेत ल्हासुर्णे ता. कोरेगांव येथील मतदान केंद्रातज्ञजाऊन मतदानाचा हक्क बजावला. “मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने सातारकरांनी मतदान करावं” , असे आवाहन या निमित्ताने उमेदवार शिंदे यांनी केले.

दरम्यान, वडगाव (उंब्रज) तालुका कराड येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गौरवी भोसले यांनी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील पवारमळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. तसेच य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व विनायक भोसले यांनीही या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला.

यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीसाठी महत्वाचा आहे. सर्व नागरिकांनी आपला मताचा पवित्र हक्क अवश्य बजावावा. तुमच्या एका मतातून या देशाला समर्थ सरकार लाभू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता मोठा प्रतिसाद देत आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित असून, ते सातारा लोकसभेचे खासदार म्हणून नक्कीच निवडून येतील, असा मला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

45 सातारा लोकसभा मतदार संघासाठी कराड, येथील नगरपरिषद शाळा क्र.९ येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कराड नगरपरिषद शाळा क्रमांक तीन मधील मतदान केंद्रावर खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुत्र सारंग पाटील व कुटुंबीयांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 43.83 टक्के मतदान

सातारा लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 32.78 टक्के मतदान झाले होते. सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या विधानसभा मतदार संघातील वाई मतदार संघात 341714, कोरेगाव 313183, कराड उत्तर 296945, कराड दक्षिण 302580, पाटण 299567, आणि सातारा 335751 इतकी मतदार संख्या आहे. या सर्वच मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानाचा वेग फारच कमी राहिला होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघांतर्गत वाई 6.11, कोरेगाव 7.16, कराड उत्तर 5.81, कराड दक्षिण 6.29, पाटण 8.77, सातारा 7.86 टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला. सकाळी 11 पर्यंत वाई 17.64, कोरेगाव 19.35, कराड उत्तर 17.88, कराड दक्षिण 18.19, पाटण 18.65, सातारा 20.69 टक्के मतदान झाले.

त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात सरासरी 32.78 टक्के मतदान झाले. त्यामध्ये वाई 31.29, कोरेगाव 33.93, कराड उत्तर 31.97, कराड दक्षिण 33.46, पाटण 33.09, सातारा 33.05 टक्के इतके मतदान झाले. तर दुपारी तीन वाजेपर्यंत वाई 41.88, कोरेगाव 45.62, कराड उत्तर 43.45, कराड दक्षिण 46.38, पाटण 41.74, सातारा 44.07 असे व सर्व मतदार संघात मिळून सरासरी 43.83 टक्के मतदान झाले.

नवमतदारापासून ते 103 वर्षाच्या वयोवृत्तापर्यंत मतदान….

2024 च्या या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात 18 वर्षानंतर मतदानाचा अधिकार मिळालेल्या हजारो तरुण नवमतदारांनी मतदान केंद्रावर येऊन रांगेत उभा राहून मोठ्या उत्साहात प्रथमच मतदान केले. तर अनेक वयोवृद्धांनी ही मतदानाचा हक्क बजावला. जमती तालुका पाटण येथील 103 वर्षे वयाच्या किसन रामचंद्र कदम यांनी, सोनगाव तालुका जावली येथील नर्मदा बाबुराव शिंदे या 85 वर्षाच्या आजींनी, तर कुडाळ येथील जयवंत कृष्णा कांबळे या 90 वर्षाच्या आजोबांनी मतदान केंद्रात येऊन मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.

तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे –
लातूर – ३२.७१ टक्के
सांगली – २९.६५ टक्के
बारामती – २७.५५ टक्के
हातकणंगले – ३६.१७ टक्के
कोल्हापूर – ३८.४२ टक्के
माढा – २६.६१ टक्के
उस्मानाबाद – ३०.५४ टक्के
रायगड – ३१.३४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
सातारा – ३२.७८ टक्के
सोलापूर – २९.३२ टक्के.

तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या  टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ४४.४८ टक्के
सांगली – ४१.३० टक्के
बारामती – ३४.९६ टक्के
हातकणंगले – ४९.९४ टक्के
कोल्हापूर – ५१.५१ टक्के
माढा – ३९.११ टक्के
उस्मानाबाद – ४०.९२ टक्के
रायगड – ४१.४३ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के
सातारा – ४३.८३ टक्के
सोलापूर – ३९.५४ टक्के

 

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close