राज्यात वाळू वाहतुकीसाठी २४ तास परवानगी – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ३ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
राज्यात आता वाळू वाहतुकीसाठी कोणत्याही वेळेची मर्यादा राहिलेली नाही! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेतील निवेदनात सांगितले की, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत अधिकृत उत्खनन केलेली वाळू आता २४ तास वाहून नेता येणार आहे.
ते म्हणाले, “सध्या फक्त दिवसा वाळूचे उत्खनन करता येते. मात्र, रात्री वाहतूक न करता आल्याने वैध बांधकाम प्रकल्पांना अडचणी येतात. काही शहरांमध्ये वाहतूक जास्त असल्याने दिवसा वाळू पोहचवणे कठीण जाते.”
मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, राज्याबाहेरून येणाऱ्या वाळूस झिरो रॉयल्टी पासवर २४ तास वाहतुकीची मुभा आहे, मात्र राज्यांतर्गत वाहतुकीवर संध्याकाळी निर्बंध होते. आता ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे उपाय:
१. ‘महाखनीज’ पोर्टलवरून ई-परवाना (eTP) २४x७ उपलब्ध.
२. जिओ-फेन्सिंग, CCTV, GPS डिव्हाइसेस बसवण्याचे बंधन.
३. वाळू वाहतूक अधिक पारदर्शक, नियंत्रित व सुलभ होणार.
“ही निर्णय प्रक्रिया राज्यातील बांधकाम प्रकल्पांना वेळेत वाळू पुरवण्यासाठी आणि अनधिकृत वाहतुकीवर लगाम आणण्यासाठी महत्त्वाची ठरेल,” असा विश्वास महसूलमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.