पगार थकल्याने साताऱ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा; २ सप्टेंबरला काम बंद आंदोलन

कराड , दि. २९, | चांगभलं वृत्तसेवा
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकले असून नेहमीच उशिराने होणाऱ्या पगारामुळे संताप व्यक्त करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा यांच्या पुढाकाराने आरोग्य कर्मचाऱ्यांनी २ सप्टेंबर रोजी एक दिवसाची किरकोळ रजा टाकून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भातील निवेदन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराच्या निषेधार्थ ऑनलाइन रिपोर्टींगचे कामही बंद केले आहे. महिना अखेरपर्यंत पगार जमा न झाल्यास २ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप साळुंखे, भुजंगराव पाटील, शरद कांबळे, अरविंद काळे (आरोग्य सहाय्यक), शेखर पन्हाळे, रोहित भोकरे, पंकज यादव, किरण पाटील, स्वप्नील सुतार, रविंद्र सुतार, दत्तात्रय गायकवाड, हेमंत कुसनाके, विनायक आरेकर आदी उपस्थित होते.