संगीताचा महानद
छोट्या छोट्या नद्या असंख्य असतात. परंतु सिंधु-ब्रह्मपुत्रेसारखे महानद क्वचितच अवतरतात, जे केवळ भूमी-माणसांच्या आयुष्याचंच सिंचन करुन थांबत नाहीत, तर संपूर्ण मानवी संस्कृतीच जन्माला घालतात. गानसरस्वती किशोरी आमोणकर हे संगीतक्षेत्रातले असे नाव होते; ज्यांनी परंपरेने आलेल्या संगीताला नवा आयाम दिला, नवा विचार दिला, जणू संगीताचे नव्याने वैचारिक भरणपोषण केले. त्याअर्थाने त्या संगीतज्ञ होत्या. गुरुपरंपरेने आलेले गाणे त्यांनी डोळे झाकून कधीच स्वीकारले नाही, किंबहुना त्या गाण्याला आपल्या ज्ञानाने पैलू पाडले आणि मगच ते रसिकांपुढे ठेवले. त्यामुळेच त्यांचे गाणे सदैव नित्य-नूतन राहिले. एकच राग, एकच बंदिश प्रत्येक वेळी नव्याने बांधण्याकडे-गाण्याकडे त्यांचा कल असायचा. त्याअर्थाने ‘प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता’ म्हणजे नवनवीन उन्मेष धारण करणारी प्रज्ञा-बुद्धि म्हणजेच प्रतिभा, याचाच प्रत्यय सातत्याने किशोरीताई द्यायच्या. अर्थात तरीही त्यांच्याकडे पराकोटीचा नम्रपणा होता. संगीताकडे त्या अतिशय श्रद्धेने पाहायच्या आणि मी अजून संगीत समजून घेतेय, असेच त्या शेवटपर्यंत म्हणत राहिल्या. कारण त्यांच्या मते गंगा नदीतून एक गडू भरून घेतला आणि तो देवघरात ठेवला, तर त्याचा अर्थ आपण गंगा पाहिली असा होत नाही. मात्र त्या गडूतील पाण्याला आपण जेव्हा गंगामाता म्हणतो, तेव्हा तिथे आपण आपली सर्व श्रध्दा पणाला लावली पाहिजे. इतर म्हणतात म्हणून नाही. आपल्याला तिचे ते रुप आकळले पाहिजे. ‘याच अर्थाने मी अजून संगीताचे रूप आकळून घेण्याच्या प्रयत्नांत आहे’, असे त्या सांगायच्या.